
-मंदिर परिसरात यूट्यूबर आणि ब्लॉगर यांच्या हालचालींवर निर्बंध-मोबाईल आणि कॅमेऱ्यांसाठी विशेष क्लॉकरूमची व्यवस्था
देहरादून, 17 मार्च (हिं.स.)। उत्तराखंडमध्ये होणाऱ्या चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बद्री-केदार मंदिर समितीने दोन धाम आणि इतर ४५ मंदिरांमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. तसेच मंदिर परिसरात यूट्यूबर आणि ब्लॉगर यांच्या हालचालींवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले.
दरम्यान बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) 2026-27 या यात्रावर्षासाठी 121 कोटी रुपयांहून अधिकचा अंदाजित बजेट मंजूर केला आहे. यावर्षी चारधाम यात्रा 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे उघडण्यासह सुरू होणार आहे. त्यानंतर 22 एप्रिलला केदारनाथ आणि 23 एप्रिलला बद्रीनाथ धाम भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. बीकेटीसीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी अभिनेत्री सारा अली खानचे उदाहरण देत सांगितले की, आता भाविकांना केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धामला भेट देण्यासाठी श्रद्धेचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.बद्री-केदारला भेट देण्यासाठी गैर-हिंदूंना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार: उत्तराखंडच्या प्रसिद्ध चार धामांपैकी दोन असलेल्या केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धामबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बद्री-केदार मंदिर समितीने आता या मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन प्रणाली जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत भाविकांना सनातन धर्मावरील श्रद्धेचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल.
हेमंत द्विवेदी म्हणाले की एखादी व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, जर सनातन धर्मावर आपला विश्वास असल्याचे कबूल करून प्रतिज्ञापत्र सादर करत असेल, तर तिला मंदिरात प्रवेश दिला जाऊ शकतो. एक उदाहरण देताना ते म्हणाले की, सारा अली खानसारखी एखादी सेलिब्रिटी जरी केदारनाथला भेट देऊन, सनातन धर्मावर आपला विश्वास असल्याचे कबूल करून प्रतिज्ञापत्र सादर करत असली, तरी तिला प्रवेश नाकारला जाणार नाही.शपथपत्र मंदिराच्या आवारात उपलब्ध असेल: समितीच्या म्हणण्यानुसार, हे शपथपत्र मंदिराच्या आवारात उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून भाविकांना तिथेच आपली श्रद्धा सिद्ध करता येईल. या निर्णयामुळे आता राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे याकडे धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचा मुद्दा म्हणून पाहिले जात आहे, तर दुसरीकडे यावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.
तसेच, मंदिर परिसरात यूट्यूबर आणि ब्लॉगर यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तसेच मोबाईल आणि कॅमेऱ्यांसाठी विशेष क्लॉकरूमची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांना मंदिर परिसरात मोबाईल नेण्यास परवानगी नसेल. मंदिराच्या गर्भगृहात कोणालाही मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तीर्थयात्रा आणि पर्यटन यामध्ये स्पष्ट फरक आहे आणि भाविकांनी तीर्थयात्रेचे पावित्र्य जपावे. तसेच ‘तीर्थ पुरोहित कल्याण कोष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे पुजाऱ्यांच्या हिताचे रक्षण होणार आहे. मंदिर परिसरातील देखभाल, रंगकाम, रेलिंग दुरुस्ती, ऑनलाइन पूजा व्यवस्था आणि वेबसाइट सुधारण्यावरही भर दिला जात असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
यावर्षी यात्रेसाठी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 6 मार्च ते 16 मार्च या कालावधीतच 6 लाख 17 हजार 853 पेक्षा अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये केदारनाथसाठी 2 लाखांहून अधिक, बद्रीनाथसाठी 1.82 लाख, गंगोत्रीसाठी 1.15 लाख आणि यमुनोत्रीसाठी 1.13 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.तसेच हिवाळी यात्रेदरम्यानही चांगला प्रतिसाद मिळाला असून 16 मार्च 2026 पर्यंत 50 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. प्रशासनाने सांगितले की, यात्रा सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी वेळेत पूर्ण केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule