
पालघर, 17 मार्च (हिं.स.)।पालघर जिल्ह्यासह परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दरभंगा आणि हावडा मार्गावर मुंबईहून नवीन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खा. डॉ. हेमंत सवरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड, पालघर, बोईसर ते वलसाड या पट्ट्यातील मोठ्या संख्येने प्रवासी मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड तसेच पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये नियमित प्रवास करतात. मात्र, सध्या थेट रेल्वे सुविधा अपुरी असल्याने प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी मुंबईला जावे लागते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई (पश्चिम रेल्वे) येथून वसई रोड, पालघर, वापी, वलसाड आणि नंदुरबार मार्गे हावडापर्यंत नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच दरभंगा आणि आसपासच्या भागासाठी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर किमान दोन नवीन गाड्या सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सध्या उपलब्ध गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. नवीन गाड्या सुरू झाल्यास प्रवास अधिक सुकर होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास खा. सवरा यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL