
प्रशासन व राजकारणाची धुरा महिलांच्या खांद्यावर
लातूर, 17 मार्च (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख पदांवर महिलांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात एकप्रकारे ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्हाधिकारीपदी वर्षा घुगे ठाकूर कार्यरत असून त्यांनी प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर दिला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासन अधिक गतिमान झाल्याचे मानले जात आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मानसी मीना कार्यरत आहेत. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांची सक्रिय भूमिका दिसून येत आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौरपदी निवड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या वलांडी गटातील उषाताई पाटील यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी त्या शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रस्ते या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले जात आहे.
महिलांच्या या नेतृत्वामुळे लातूर जिल्ह्याच्या प्रशासनिक आणि राजकीय क्षेत्रात नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निर्णय प्रक्रियेत संवेदनशीलता, पारदर्शकता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन वाढेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
एकेकाळी पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या कार्यकौशल्यामुळे लातूर जिल्ह्यात सुशासन आणि विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis