
लातूर, 17 मार्च, (हिं.स.)। महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित 'लातूर जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५-२६' चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या सोहळ्यात ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध उपविभागातील खेळाडूंनी शिस्तबद्ध पथसंचलन (परेड) केले. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या पथकाचे नेतृत्व केले. यावेळी सर्व स्पर्धकांना क्रीडा नियमांचे पालन करण्याची शपथ देण्यात आली. उद्घाटनानंतर झालेल्या झुंबा डान्समध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः सहभागी होऊन कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
कोतवाल ते अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अशा सर्व संवर्गातील कर्मचारी-अधिकारी यांचा या स्पर्धेतील उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद आहे. लातूर जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी सांघिक भावनेने आणि चिकाटीने आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे. लातूर जिल्ह्याला राज्यस्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळवावे, यासाठी सर्वांनी मनपासून प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. अतिशय कमी कालावधीत स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
या स्पर्धा म्हणजे केवळ क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम नसून सतत कामाच्या तणावात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा देणारा उपक्रम आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी पूर्ण सचोटीने सहभाग नोंदवून चांगली कामगिरी करावी. दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडताना आपले आरोग्य, शारीरिक स्वास्थाकडे लक्ष द्यावे. एखाद्या मैदानी खेळाची आवड जोपासून त्यासाठी नियमितपणे वेळ द्यावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची परेड अतिशय उत्स्फूर्त झाली. सर्वांनी दोन दिवसीय स्पर्धा काळात कामाचा ताण विसरून खेळांमध्ये सहभागी होवून चांगली कामगिरी करावी. या स्पर्धेतील सहभागाचा आनंद अनुभवा, मनापासून खेळा. खेळ असो की दैनंदिन जबाबदाऱ्या, जिंकल्यावर जल्लोष करणे, पराभवानंतर खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारणे आवश्यक असते. महसूल, पोलीस विभागाच्या जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा होतात. मात्र लातूर जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि इतर विभागांच्या एकत्रित स्पर्धांचे आयोजन व्हावे. विविध विभागांच्या एकत्रित स्पर्धा झाल्यास विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यातील बाँडिंग वाढण्यासाठी मदत होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छांऐवजी ग्रंथ देऊन करण्यात आले. तसेच विविध महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचाही यावेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले. या दोन दिवसीय स्पर्धेत विविध मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis