
मुंबई, 17 मार्च (हिं.स.)भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीग हंगामापूर्वी, पाच वेळा विजेते ठरलेल्या या संघाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील झाला आहे. रोहित शर्माने एकूण सहा आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत. यामध्ये डेक्कन चार्जर्ससोबतच्या एका विजेतेपदाचा आणि मुंबईस्थित संघाचा कर्णधार म्हणून मिळवलेल्या पाच विजेतेपदांचा समावेश आहे. यामुळे तो या स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्तपणे सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
रोहितने २०११ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि २०१३ मध्ये त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. 'हिटमॅन'ने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात मुंबई संघाला विजय मिळवून दिला आणि २०२४ च्या हंगामापर्यंत ११ वर्षे एमआयचे कर्णधारपद भूषवले. २०२४ मध्ये, स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याची जागा कर्णधार म्हणून घेतली.
सोमवापासून मुंबई इंडियस्नने अधिकृतपणे हंगामापूर्व सरावाला सुरुवात केली. हे आगामी २०२६ च्या हंगामातील पहिलेच सराव सत्र होते. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मैदानावर या सत्राचे नेतृत्व केले. त्यांना गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि लसिथ मलिंगा, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन, तसेच 'स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग' आणि फिजिओथेरपीच्या संपूर्ण सहाय्यक संघांनी साथ दिली.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले, हंगामापूर्व सरावाच्या पहिल्या दिवसात नेहमीच काहीतरी विशेष असते. क्रिकेटपटू मैदानावर दाखल होताना पाहून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि या सरावाची दमदार सुरुवात करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असते. आमच्या संघात असे खेळाडू आहेत ज्यांना या फ्रँचायझीची इत्थंभूत माहिती आहे; त्याचबरोबर काही नवीन आणि उत्साहवर्धक चेहरेही आमच्या संघात दाखल झाले आहेत.
जयवर्धने पुढे म्हणाले, पहिले सराव सत्र नेहमीच रोमांचक असते, पण ती एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवातही असते; आणि आम्ही नक्की कशासाठी तयारी करत आहोत, हे आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. स्पर्धेपूर्वीच्या सरावाची तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसतसे संघातील उर्वरित क्रिकेटपटूही येत्या काही दिवसांत या शिबिरात सामील होतील अशी अपेक्षा आहे.
आयपीएल २०२६ हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ:
हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघु शर्मा, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफनझार, अश्वनी कुमार, दीपक चहर, विल जॅक्स, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इझहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे