
बीड, 17 मार्च, (हिं.स.)। कारखान्याशी संबंधित कर्मचारी तसेच सभासदांच्या घरी मुलगी जन्माला आल्यास त्या कुटुंबाच्या खात्यावर १० हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा खा. बजरंग सोनवणे जाहीर केले. मुलींचा जन्म साजरा व्हावा, तसेच समाजात मुलींबाबत सकारात्मक विचार वाढावा आणि कन्या जन्माबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे खा. सोनवणे यांनी स्पष्ट केले.
येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१, आनंदगाव (ता. केज) येथे सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमात येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा खा. बजरंग सोनवणे यांनी कर्मचारी व सभासदांसाठी महत्त्वपूर्ण आणि समाजाभिमुख घोषणा केली.
समाजात मुलगा-मुलगी भेद न करता दोघांनाही समान मान मिळायला हवा. मुली आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे कारखान्याच्या सभासद व कर्मचारी वर्गात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळेल आणि समाजात सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आनंदगाव येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१ येथे सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कारखान्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी कारखान्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व संबंधितांचे खा. सोनवणे यांनी मनापासून आभार मानले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच कारखान्याची प्रगती शक्य होत असून शेतकरी, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कारखान्याने यशस्वी गळीत हंगाम पूर्ण केला आहे. आगामी काळातही अशीच साथ लाभेल आणि कारखाना अधिक प्रगती करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, सभासद, कर्मचारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis