
पुणे, 17 मार्च (हिं.स.)महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून प्रशासनाने ९५४ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली केली आहे. पण या १ लाख ६४ हजार ६६५ थकबाकीदारांचा तब्बल ७९२ कोटी २१ लाख रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेच्या विकास कामांना, नवीन प्रकल्प, रस्ते करण्यासाठी भूसंपादनाची गरज आहे. पण त्यासाठी पुरेसा निधी शिल्लक नाही. निधी उभारणीसाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पण त्यास जास्त प्रतिसाद नव्हते. अनेकांनी पैसे न भरल्याने पुन्हा एका महिन्याची म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा मागणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेचा कालावधी वाढविण्यात आला. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ द्यावी असा ठराव दिला होता. पण तो फेटाळण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु