
पुणे, 17 मार्च (हिं.स.) - पवना नदीचे प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. रावेत बंधारा, मामुर्डी आणि किवळे परिसरातील सुमारे ३५ सोसायट्यांमधील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) बंद असल्याने तेथील मैलापाणी, सांडपाणी विनाप्रक्रिया नाल्यांवाटे थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तिची दखल घेऊन पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.
पवना नदी ही शहराच्या पाणी पुरवठ्याची जीवनवाहिनी मानली जाते. रावेत येथील प्रभाग क्र.१६ मध्ये महानगरपालिकेचा २० एमएलडी क्षमतेचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) असून तो सुरळीत सुरू आहे. तेथे मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी पवना नदीत सोडले जाते. मात्र, आजूबाजूच्या सोसायट्यांमधून थेट नाल्यांत सोडण्यात येणाऱ्या मैलापाणी, सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता घसरत असून पर्यावरणाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. याच नदीतील पाणी शुद्ध करून पिंपरी चिंचवडकरांना पिण्यासाठी पुरवले जाते. त्यामुळे ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु