
सोलापूर, 17 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या १६ हजारांवर असली, तरी योग्य सुरक्षिततेच्या अभावामुळे ती जीवघेणी ठरत आहेत. उन्हाळ्यात पोहण्यासाठी गेलेली मुले किंवा पाणी प्यायला गेल्यावर चुकून पडलेल्या अनेक बालके व शेतकऱ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. बहुतेक शेततळ्यांना तारेचे कुंपण नसल्याने शेततळी ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहेत.
तीव्र उन्हाळ्यात शेतीपिकांना पाण्याची आवश्यकता खूप असते. विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर जाते, दूर अंतरावरून केलेल्या पाइपलाइनमध्ये पुरेशा दाबाने पाणी येत नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरी दूर असतात आणि शेती दुसरीकडे असते. अशावेळी पाण्याच्या सोयीसाठी शेतकरी शेततळी खोदतात. त्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. शेततळे खोदल्यावर अस्तरीकरण (कागद तथा ताडपत्री) केले जाते. त्यामुळे शेततळ्याला पायऱ्या नसतात. शेततळ्याची लांबी-रुंदी ४५ ते ६५ फूट लांब असते. बहुतेक शेततळी शेतकऱ्यांच्या घरापासून दूर असतात. त्यामुळे पोहायला किंवा पाणी प्यायला गेलेल्यावर पोहायला न येणारा तळ्यात पडला की त्याचा जातोय अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड