अहमदपूरमध्ये कत्तलीसाठी नेले जाणारे ९ बैल जप्त
लातूर, 18 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई ते अहमदपूर महामार्गावर कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो अहमदपूर पोलिसांनी पकडला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ९ खिलार जातीचे बैल आणि वाहन असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देम
पोलीस कारवाई


लातूर, 18 मार्च (हिं.स.)।

अंबाजोगाई ते अहमदपूर महामार्गावर कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो अहमदपूर पोलिसांनी पकडला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ९ खिलार जातीचे बैल आणि वाहन असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका आयशर टेम्पोमधून गुरांची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे वाकी नदीच्या पुलाजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी संशयास्पद आयशर टेम्पो (क्रमांक MH 04 GC 3724) अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयतेने ९ बैल बांधलेले आढळून आले.

या कारवाईत १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीचे ९ खिलार बैल (४.५० लाख) असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख शकील खयरोदीन (५१ वर्षे) आणि उमेष गणेश जोगदंड (२८ वर्षे, दोन्ही रा. नेकनूर, जि. बीड) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अंमलदार मारुती व्यंकटराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३१/२०२६ नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(जी), ११(१)(इ), ५(ए)(२), ५(बी) व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (ए) (१), ५ (२), ५(बी), ९ सह मोटार वाहन अधिनियम १९८९ ची कलम १३०, १४९, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती शिंदे, साबळे आणि चालक मुंडकर यांनी यशस्वी केली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार दिडगे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande