
अकोला, 18 मार्च (हिं.स.)। जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत मोठा घोळ उघडकीस आला असून, या प्रकरणाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत खळबळ उडाली आहे. दिव्यांग संवर्गाच्या नावाखाली खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह पाच शिक्षकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वीही बदली प्रक्रियेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिक्षण विभागाचा हा नवा कारनामा उघड झाला. तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देत पं. स. स्तरावर त्रिस्तरीय समित्या नेमल्या. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
नियमांना हरताळ, कागदपत्रांमध्ये खेळ
दिव्यांगत्वासंदर्भातील शासकीय नियमांची पायमल्ली करत खोटी माहिती सादर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांनीही शिक्षकांच्या कागदपत्रांची कसून तपासणी न करता सरळ मंजुरी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. परिणामी, अपात्र शिक्षकांना बदलीस पात्र ठरवून त्यांच्यावर कोणतीही कारवाईच केली नाही, असे चौकशी अहवालात नमूद आहे.
अहवालही अपूर्ण
कागदपत्रांची पडताळणी करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, अनेक ठिकाणी सादर झालेले अहवाल त्रुटीपूर्ण आणि अपूर्ण असल्याचे समोर आले.
दिव्यांग कोट्याचा उघड गैरवापर
काही शिक्षकांनी दिव्यांग संवर्ग-१ अंतर्गत बदली मिळवण्यासाठी थेट खोटारडेपणाचा आधार घेतल्याचे चौकशीत दिसून आले. लहान भावाचे पालकत्व स्वीकारल्याचा बनावट दाखला सादर करून विशेष संवर्गाचा लाभ उचलल्याचेही उघड झाले आहे.
हे अधिकारी-शिक्षक सस्पेंड
कर्तव्यात कसूर आणि नियमभंग केल्याच्या आरोपावरून शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश दुतंडे, निमकर्दा येथील सहायक शिक्षक श्रीकांत वानखडे, वाडेगाव येथील शिक्षक हमीद हुसेन लियाकत हुसेन, आकोट येथील शिक्षक ज्ञानेश्वर भोयर, अकोला येथील शिक्षक राजेंद्र पुंजाजी ताडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
आणखी मोठी कारवाई होणार?
या प्रकरणामुळे शिक्षण विभागातील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पंचायत समिती स्तरावरील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. पुढील काळात बदली प्रक्रियेत 'साफसफाई' मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे