
कोल्हापूर, 18 मार्च, (हिं.स.)। समाजामध्ये जगताना तृतीयपंथीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सामाजिक बहिष्कार, भेदभाव, कौटुंबिक नकार आदी समस्यांचा समावेश आहे. तृतीयपंथियांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात तृतीयपंथीय कल्याण हक्क संरक्षण समिती,ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समिती तसेच हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांच्या पुनर्वसन अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत समितीची बैठक आज पार पडली.
जिल्हाधिकारी म्हणाले, तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे.त्याचाच भाग म्हणून पिंक रिक्षा तृतीयपंथियांना चालविण्यासाठी देण्याबाबतची बाब विचाराधीन आहे. आगामी बैठकीपर्यंत उर्वरीत तृतीयपंथीयांना रेशन व मतदान कार्ड देण्याबाबत संबंधित विभागाने कारवाई करावी.या कामी स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.जिल्ह्यात ज्या तृतीयपंथींना पोर्टलवर नोंदणी केली आहे अशा 205 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.तसेच उर्वरित 48 जणांनाही घरपोच प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
समाज कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकांसाठी जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, महिला बाल विकास अधिकारी सुहास वाइंगडे, पोलीस उपाधिक्षक सुवर्णा पत्की,जिल्हा सह आयुक्त न. पा देवानंद ढेकळे,सहा.गटविकास अधिकारी जि.प. अविनाश मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ . रेश्मा पाटील, दीपा शिपुरकर, मैत्री संघटनेच्या सुहासिनी देवमाने, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशासकीय सदस्य बाळासाहेब फरकाटे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी - कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar