इराणच्या गुप्तचर मंत्र्यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू, इस्त्रायलचा दावा
इस्त्रायल काटझ यांनी केली इस्माईल खतीबच्या मृत्यूची घोषणा तेल अवीव, 18 मार्च (हिं.स.) : इस्रायलने इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याचा मोठा दावा केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी ही घोषण
इस्माईल खतीब, इराणचे गुप्तचर मंत्री


इस्त्रायल काटझ यांनी केली इस्माईल खतीबच्या मृत्यूची घोषणा

तेल अवीव, 18 मार्च (हिं.स.) : इस्रायलने इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांना हवाई हल्ल्यात ठार केल्याचा मोठा दावा केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, तेहरानमध्ये मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या लक्षित हल्ल्यात खतीब यांचा मृत्यू झाला.मात्र, या दाव्याबाबत इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

यापूर्वी इस्रायलने मंगळवारीच इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारिजानी तसेच बसीज फोर्सचे प्रमुख गोलामरेजा सुलेमानी यांना ठार केल्याचा दावा केला होता. खतीब यांच्या मृत्यूचा दावा या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात समोर आल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढल्याचे मानले जात आहे. संरक्षण मंत्री काट्झ यांनी सांगितले की, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आदेशानुसार इराणमधील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला अतिरिक्त परवानगीशिवाय लक्ष्य केले जाऊ शकते. इस्माईल खतीब हे इराणच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख होते. ते शिया धर्मगुरू असून 1980 च्या दशकातील इराण-इराक युद्धात त्यांनी रिव्होल्यूशनरी गार्डमध्ये सेवा बजावली होती. 2022 मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने सायबर गुप्तहेरगिरी आणि रॅन्समवेअर हल्ल्यांशी संबंधित नेटवर्क चालवल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर निर्बंध लादले होते.

हा हल्ला 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या इस्रायल-अमेरिका यांच्या इराणवरील युद्धाच्या मालिकेचा भाग मानला जात आहे. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. इराणने या हल्ल्यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे.दरम्यान, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी इस्रायलच्या कारवायांना “युद्धाच्या सामान्य नियमांच्या बाहेरील बेकायदेशीर कृत्ये” असे संबोधले आहे. -------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande