रत्नागिरी : कसबा-संगमेश्वरचा शिंपणे उत्सव उत्साहात
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : कसबा-संगमेश्वर येथील जाखमातेचा पारंपरिक ''शिंपणे'' उत्सव आज (दि. १८ मार्च) अपूर्व उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा झाला. या उत्सवासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या मनसोक्त उधळणीमुळे
कसबा संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव


रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : कसबा-संगमेश्वर येथील जाखमातेचा पारंपरिक 'शिंपणे' उत्सव आज (दि. १८ मार्च) अपूर्व उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा झाला. या उत्सवासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या मनसोक्त उधळणीमुळे कसबा-संगमेश्वर येथील सर्व रस्ते लाल होऊन गेले होते. ढोल-ताशांच्या कडकडाटासह रंगांची उधळण आणि मटण-भाकरीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेत भाविकांनी या उत्सवाचा आनंद लुटला.

शिंपणे उत्सवाची सुरुवात आणि सांगता ढोल-ताशांच्या गजरातील फेऱ्यांनी झाली. सकाळी ६ वाजल्यापासूनच उत्सवातील रंगांच्या उधळणीला सुरुवात झाली होती. दुपारी ३ च्या दरम्यान मोठ्या चारचाकी वाहनावर लाल रंगाच्या पाण्याची पिंपे भरून आणण्यात आली. या पिंपांमधील लाल रंग फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवण्यात आला. रस्त्यावरच तसेच फेऱ्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधूनही भाविकांच्या अंगावर लाल रंगाचा वर्षाव करण्यात येत होता. दुपारनंतर उत्सवाचा उत्साह आणखी वाढला. ढोल-ताशांच्या गजरात झांज पथक आणि डीजेवरील गाण्यांच्या तालावर हजारो पाय थिरकायला लागले. सुमारे सहा तास हा जल्लोष सुरू होता.

या उत्सवादरम्यान घरोघरी आनंदाचे वातावरण होते. प्रत्येक घरात काजुगर घातलेले मटण, वडे आणि भाकरी असा बेत आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. परंपरेनुसार एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते. धार्मिक विधी म्हणून कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तगणांनी दर्शनासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.

दुपारनंतर देवाला रखवाली देण्यास सुरुवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा समावेश होता. दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा मंदिराच्या जवळच प्रसाद तयार करण्यात आला. या प्रसादासह रात्री पाण्याचा हौद फोडताना दिलेल्या बळीचा प्रसाद एकत्र करून, उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले. रात्री कसबा व संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर, मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली.उत्सवादरम्यान संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भक्तगणांना धन्यवाद दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande