
लातूर, 18 मार्च (हिं.स.) : शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढ यामुळे लातूरमधील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अरुंद रस्ते, अनियोजित पार्किंग आणि वाढत्या व्यापारी हालचालींमुळे प्रमुख चौकांमध्ये, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौकात, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत तांत्रिक विश्लेषण, प्रशासकीय हस्तक्षेप आणि नागरिकांच्या सहभागावर आधारित उपाययोजना लागू केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओव्हरब्रिज, भुयारी मार्ग आणि स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग या परिसरांची पाहणी करून वाहतुकीचा सखोल अभ्यास केला.
भर पावसातही अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर पायी फिरून रस्त्यांची रुंदी, वळणांची रचना, पार्किंगमुळे होणारे अडथळे आणि वाहतुकीचा प्रवाह यांचा बारकाईने अभ्यास केला. या पाहणीमुळे समस्येची मूळ कारणे ओळखून त्यावर प्रभावी उपाययोजना निश्चित करण्यात येत आहेत.
या उपक्रमांतर्गत दररोज दुपारी 12 ते 2 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक नियंत्रण व पर्यायी मार्गांचा वापर सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगातून निर्माण होणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, अनधिकृत पार्किंग टाळण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis