
सोलापूर, 18 मार्च (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाचे मिस्टर नगरसेवक जॉन फुलारे यांचा सोमवारी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित श्रीदेवी फुलारे हॅट्ट्रिक नगरसेविका झाल्यामुळे यंदाच्या वाढदिवसाचा उत्साह वेगळाच होता. या प्रसंगी एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
महापालिकेत सध्या भाजपच्या 87 नगरसेवकांवर नडत असलेले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक चेतन नरोटे यांनी जॉन फुलारे यांना एकत्रित शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे देखील उपस्थित होत्या.
वाढदिवसाच्या या कार्यक्रमामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे, कारण विधानसभा निवडणुकीत जॉन फुलारे यांनी काँग्रेसवर नाराजगी दर्शविली होती, परंतु चेतन नरोटे यांच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. महापालिका निवडणुकीत मात्र ते एकमेकांच्या विरोधात लढले होते.
सध्या अंबादास करगुळे यांचा पराभव झाल्यामुळे ते नाराज आहेत आणि आपल्याच पक्षातील काही जणांवर खाजगी आरोप केल्याचे चर्चा रंगली आहे. त्याच दरम्यान शिंदे आणि नरोटे यांनी फुलारे यांचा सत्कार केल्याने याची राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड