रायगड - एलपीजी पुरवठ्यावर ‘अलर्ट मोड’; नियंत्रण कक्ष सुरू
रायगड, 18 मार्च, (हिं.स.)। राज्यात एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना राबवत ‘अलर्ट मोड’वर काम सुरू केले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती देताना नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट
State's 'alert mode' on LPG supply; Control room opened, strict action taken against black market


रायगड, 18 मार्च, (हिं.स.)। राज्यात एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना राबवत ‘अलर्ट मोड’वर काम सुरू केले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती देताना नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे स्पष्ट आवाहन केले.

राज्यस्तरावर विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून 9769919221 हा व्हॉट्सअॅप क्रमांक तक्रारींसाठी जारी करण्यात आला आहे. रिफायनऱ्यांमधील उत्पादन वाढवत एलपीजी निर्मिती ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत नेण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जानेवारी ते १५ मार्चदरम्यान २,१२९ तपासण्या करण्यात आल्या असून १,२०८ सिलेंडर जप्त, २३ गुन्हे दाखल आणि १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे ₹६० वाढ झाली असली, तरी केंद्र सरकारकडून प्रति सिलेंडर ₹३०० अनुदान दिले जात असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य शासनाकडून तीन सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे काही प्रमाणात पुरवठा खंडित झाला असला, तरी जहाजे मुंबई, कांडला आणि कोची येथे पोहोचत असून परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आवश्यकतेनुसार कोळसा व रॉकेल यांसारख्या पर्यायी इंधनाचाही वापर करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande