
परभणी, 20 मार्च (हिं.स.)।
पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील श्री हनुमान मंदिर, कुंभार बावडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दि. २६ मार्च पासून सुरू होऊन दि. २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास अनंत श्री विभूषित १००८ वेदांताचार्य, महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज (रूठी आश्रम) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच ह.भ.प. भागवताचार्य बाळु महाराज उगले गव्हाणकर, विश्वंभर महाराज मालोदे, उत्तरेश्वर महाराज (आळंदी), योगेश महाराज गायके, स्वामी महेश्वरानंद महाराज गिरी, ज्ञानेश्वर महाराज भारती, संतोष महाराज दैठणकर आदी मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकारांची प्रवचने होणार आहेत. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ तसेच रात्री हरिकीर्तन व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिला मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण, तर नामदेवनगर येथील भजनी मंडळींकडून गाथा भजन सादर करण्यात येणार आहे. दि. २ एप्रिल रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी १० ते १२ या वेळेत स्वामी मनिषानंद पुरीजी महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.हा सप्ताह समस्त ग्रामस्थ व नवयुवक तरुण मंडळ, माळीवाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis