
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : कवी केशवसुतांची जन्मभूमी आणि साहित्यिकांनी गौरवलेली कवितेची राजधानी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन यावर्षी २३ आणि २४ मार्च रोजी होणार आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातील कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर साहित्यिक मालगुंडनगरीत दाखल होत आहेत. सोमवारी, दि. २३ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची सभा व त्यानंतर स्नेहभोजन, रात्री ९ वाजता कोमसापच्या सभासदांसाठी असलेले खुले काव्यसंमेलन होईल.
मंगळवारी, दि. २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता वर्धापन दिनाच्या उद्घाटन सोहळा होईल. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोमसापचे विश्वस्त उदय सामंत, विश्वस्त आमदार संजय केळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिताताई कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्त रेखाताई नार्वेकर, विश्वस्त एल. बी. पाटील, विश्वस्त अतुल कर्णिक, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, दीपा ठाणेकर, दक्षिण कोकण विभाग युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मोहन भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे व विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कोमसापच्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कोकण मराठी साहित्य परिषदेचा आजवरचा प्रवास यासंदर्भात चर्चासत्र व निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.
ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निमंत्रितांच्या कविसंमेलनामध्ये एल. बी. पाटील, अरुण मोर्ये, राष्ट्रपाल सावंत, रुजारियो पिंटो हे मान्यवर कवी सादरीकरण करतील.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी