
नवी दिल्ली , 20 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी देशातील सर्व विमान कंपन्यांना खाडी देशांच्या हवाई क्षेत्रांपासून दूर राहण्याचे तसेच सुरक्षा जोखीम मूल्यांकन करून आपत्कालीन (आकस्मिक) योजना तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवासी आणि उड्डाणांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने एअर इंडियाला फ्लाइट ड्यूटी मानकांमध्ये तात्पुरती सवलत देण्याचा निर्णय घेतला होता.
इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रांवरील निर्बंधांमुळे एअर इंडियाला पर्यायी आणि अधिक लांब उड्डाण मार्गांचा वापर करावा लागत आहे, त्यामुळे उड्डाणाचा कालावधी वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन परिस्थतीत सामान्य होईपर्यंत एअर इंडियाला ही तात्पुरती दिलासा देण्यात आली आहे.
दरम्यान केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी बुधवारी सांगितले की, पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न आणि संवाद साधत आहे. त्यांनी सांगितले की पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिका येथे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा हवाई मार्ग असून या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात.
नायडू म्हणाले, “सुरुवातीपासूनच आम्ही विमान कंपन्यांशी सतत संपर्कात आहोत, कारण त्यांची सेवा सुरळीत सुरू राहणे ही आमची प्राथमिकता आहे.” त्यांनी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असल्याचेही मान्य केले. काही विमानतळ सध्या बंद असल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम आशियातील सध्याचा संघर्ष २८ फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर सुरू झाला, त्यानंतर अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव तीव्र झाला. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने खाडी देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केले, ज्यामुळे संपूर्ण खाडी प्रदेश युद्धाच्या विळख्यात सापडला आहे.या युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली असून त्यातून ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode