होर्मुझ सामुद्रधुनीतील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध
लंडन, 20 मार्च (हिं.स.) : युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. लंडन येथे गुरुवारी आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदे
भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी


लंडन, 20 मार्च (हिं.स.) : युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

लंडन येथे गुरुवारी आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत बोलताना त्यांनी सर्व नाविकांची सुरक्षितता, नौवहन स्वातंत्र्य, सागरी सुरक्षा तसेच व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत भारताच्या कटिबद्धतेवर भर दिला. यावेळी दोराईस्वामी म्हणाले की, बदलत्या परिस्थितीबाबत भारताला गंभीर चिंता वाटत आहे. त्यांनी तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले असून, संयम बाळगणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेचव्यावसायिक जहाजांवर हल्ले करणे आणि नागरी सागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. अशा घटनांमुळे निरपराध लोकांचे जीव गेले असून अनेकजण जखमी झाले आहेत, तसेच धोका अधिक वाढला आहे, असेही दोराईस्वामी यांनी नमूद केले. भारत हा जगातील नाविक पुरवणाऱ्या पहिल्या तीन देशांपैकी एक असून, जागतिक नाविक कार्यबलात सुमारे 13 टक्के योगदान देतो. त्यामुळे सर्व नाविकांच्या सुरक्षिततेबाबत भारत गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यासोबतच आयएमओ परिषदेने व्यापारी जहाजांविरुद्धच्या धमक्या आणि हल्ल्यांचा निषेध करत खाडी क्षेत्रातील जहाजांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय समन्वयाची गरज व्यक्त केली. परिषदेत “मॅरिटाईम सेफ्टी कॅरिडोअर” अर्थात सागरी सुरक्षा मार्गिका उभारण्याच्या प्रस्तावालाही चालना देण्यात आली आहे, ज्यामुळे उच्च जोखमीच्या भागातून जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन करता येईल. दरम्यान, विक्रम दोराईस्वामी सध्या यूकेमधील भारतीय उच्चायुक्त असून, त्यांची चीनमधील भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्व लडाखमधील दीर्घकालीन तणावानंतर भारत-चीन संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. ते लवकरच चीनमध्ये आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande