
नागपूर, 20 मार्च (हिं.स.) : सध्या जगात वाढत असलेल्या संघर्ष आणि युद्धांमागे स्वार्थ आणि वर्चस्वाची स्पर्धा हेच मुख्य कारण आहे. भारत आपल्या सद्भावना, शांतता आणि मानवतावादी दृष्टिकोनाच्या बळावर या संघर्षांना थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते आज, शुक्रवारी नागपुरातील विश्व हिंदू परिषद कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, जोपर्यंत माणूस स्वार्थाच्या पलीकडे विचार करत नाही, तोपर्यंत जगात शाश्वत शांतता प्रस्थापित होणे कठीण आहे. केवळ बाह्य करार किंवा समजुतींनी शांतता निर्माण होत नाही, तर समाजात मूल्ये, शिस्त आणि एकता यांची गरज असते.गेल्या सुमारे 2000 वर्षांत जगाने संघर्ष सोडवण्यासाठी अनेक प्रयोग केले, परंतु त्यापैकी फारच कमी यशस्वी ठरले. त्यामुळे आता मानवजातीने खऱ्या अर्थाने शाश्वत शांततेकडे नेणारे मार्ग स्वीकारण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. आजही समाजात धार्मिक असहिष्णुता, जबरदस्ती धर्मांतर आणि उच्च-नीच भेदभाव पूर्णपणे संपलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच काही देश जगाकडे ‘अस्तित्वाच्या संघर्षा’च्या दृष्टीने पाहतात, तर भारताचा दृष्टिकोन मानवता, सहअस्तित्व आणि एकात्मतेवर आधारित आहे. त्यामुळेच जगात शांतता आणि संतुलन निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे आशेने पाहिले जात असल्याचे सरसंघचालकांनी अधोरेखित केले.
भागवत यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा उल्लेख करत सांगितले की, संपूर्ण सृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे आणि मूलत: एकच आहे, असे आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे. आधुनिक विज्ञानही आता हळूहळू याच निष्कर्षाकडे वाटचाल करत आहे.शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, धर्म केवळ ग्रंथांपुरता मर्यादित नसून तो व्यक्तीच्या आचरणात आणि वर्तनात दिसला पाहिजे. समाजाने एकत्र येऊन या जागतिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी