
नवी दिल्ली , 20 मार्च (हिं.स.)। रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दूतावास मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात असून या प्रकरणात शक्य ती सर्व मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, १८ मार्च रोजी घडलेल्या अलीकडील घटनांमुळे रियाध येथे एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. दूतावास मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव असीम महाजन यांनी सांगितले की, काल उशिरा रात्री रियाध येथे झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. रियाध येथील आमचे मिशन कुटुंबीयांच्या संपर्कात असून पार्थिव देह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, दुर्दैवाने विविध घटनांमध्ये आतापर्यंत ६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक नागरिक बेपत्ता आहे. सौदी अरेबिया, ओमान, इराक आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील भारतीय मिशन्स बेपत्ता भारतीय नागरिकाच्या शोधासाठी तसेच मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव देह शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode