
परभणी, 20 मार्च (हिं.स.)।
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील ईदगाह मैदान व इतर नमाज स्थळांवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शनिवारी (दि. २१ मार्च) सकाळी ७.३० वाजता शहरात रमजान ईदची नमाज अदा होणार असल्याने महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गुरुवारी पाहणी केल्यानंतर महापौरांनी शुक्रवारी पुन्हा ईदगाह मैदानास भेट देत तयारीचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी, स्वच्छता निरीक्षक कुणाल भाळसाकळे यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. महापौरांनी ईदगाह मैदानाची स्वच्छता करून घेण्याच्या तसेच पाणी टाकून मैदानाची दबई करण्याच्या सूचना दिल्या. महापौर सय्यद इकबाल यांनी ईदगाह मैदान, अमिनसाब बाबा दर्गा, साखला प्लॉट, लोहगाव रोड, पिंगळगड नाला, दर्गा रोड आदी ठिकाणांचीही पाहणी केली. नमाज स्थळी भाविकांसाठी शामियाना, कमान, सतरंजी, टेबल-खुर्च्या यांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नमाजाच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा शिरकाव होऊ नये यासाठी लोखंडी जाळीचे बॅरिकेट्स लावण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाला स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व टँकरची व्यवस्था करण्यास सांगितले. मैदान परिसरातील खड्डे भरून रोलरने दबई करण्याचे आदेशही देण्यात आले. विद्युत विभागाला सर्व पथदिवे व हायमास्ट दिवे सुरू ठेवण्याच्या, तर अग्निशमन विभागाला आवश्यक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील रस्ते व नाल्यांची नियमित स्वच्छता करण्याचे निर्देशही देण्यात आले. ईदच्या दिवशी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी नमाज स्थळी उपस्थित राहून व्यवस्था सुरळीत ठेवतील, याची दक्षता घेण्याचे आदेश महापौरांनी दिले. या प्रसंगी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त कदम, आल्केश देशमुख, जुबेर हाश्मी आदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. दरम्यान, रमजान ईदच्या निमित्ताने महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, सभागृह नेते सय्यद समी ऊर्फ माजु लाला तसेच आयुक्त नितीनजी नार्वेकर यांनी शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis