रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठातर्फे शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे १८ मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील नावीन्यपूर्ण शेतकऱ्यास शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्य
रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठातर्फे शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार


रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे १८ मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील नावीन्यपूर्ण शेतकऱ्यास शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी जाहीर केले आहे.

या पुरस्कारासाठी पात्र शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे संबंधित संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा संचालक, विस्तार शिक्षण यांच्या कार्यालयाकडे सहभाग नोंदवावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेत प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे १८ मे रोजी निवड झालेल्या शेतकऱ्याचा भव्य समरोहात सत्कार करण्यात येणार आहे.

जे शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, विद्यापीठ शिफारशींचा अवलंब, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात लक्षणीय योगदान करतात, त्या शेतकऱ्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल, इच्छुक शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील फॉर्म डाऊनलोड करून आवश्यक माहिती भरावी. पात्र शेतकऱ्यांनी आपले जीवनवृत्त (बायोडेटा) नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माहिती आणि पुराव्यासह संबंधित जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक यांच्याकडे किंवा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग आणि रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत जि. रायगड किंवा दोन्ही विभागातील पात्र शेतकऱ्यांनी संचालक विस्तार शिक्षण, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या कार्यालयाकडे १३ एप्रिलपर्यंत हार्ड कॉपीद्वारे पाठवावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande