
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : कोळंबे खांबाचा मळा (ता. रत्नागिरी) परिसरात 'ब्लॅक पँथर' (काळा बिबट्या) आज सकाळी विहिरीत पडला. वासराचा पाठलाग करण्याच्या नादात हा बिबट्या विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
कोळंबे येथील खांबाचा मळा भागात राहणाऱ्या भागवत यांच्या विहिरीजवळ आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काही हालचाल जाणवली. कुतूहलापोटी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, तेथे काळा बिबट्या पाण्यात पडल्याचे दिसले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, पहाटे एका वासराचा पाठलाग करत असताना हा ब्लॅक पँथर थेट विहिरीत कोसळला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम पिंजरा आणि आवश्यक रेस्क्यू साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. त्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विहिरीत पाणी असल्याने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे.
बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वन विभागाचे कर्मचारी अत्यंत सावधगिरीने काम करत आहेत. विहिरीत शिडी किंवा पिंजरा सोडून त्याला त्यात जेरबंद करण्याचे नियोजन केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी