
लातूर, 21 मार्च, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांअंतर्गत दोन कर्णबधिर बालकांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. लातूर येथील गोरे कान, नाक, घसा हॉस्पिटलमध्ये शनिवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्या संकल्पनेतून ५ टक्के दिव्यांग कल्याण सेस निधीतून सन २०२५-२६ या वर्षात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील कर्णबधिर व दिव्यांग व्यक्तींना ही महागडी शस्त्रक्रिया परवडत नसल्याने जिल्हा परिषदेमार्फत अर्थसहाय्य देऊन त्यांना दिलासा देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत लातूरमधील तज्ञ कान, नाक, घसा चिकित्सक डॉ. आनंद गोरे व डॉ. सुधीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन बालकांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाबाई पाटील, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, डॉ. हर्षदा गोरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
कार्तिक व मन्मथला मिळाला लाभ
या योजनेअंतर्गत लातूर तालुक्यातील कार्तिक ज्योतीराम शिंदे आणि निलंगा तालुक्यातील सांगवी जेवरी येथील मन्मथ जीवन पाटील या दोन बालकांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली.
महागडी असलेली ही शस्त्रक्रिया सेस निधीतून उपलब्ध करून दिल्यामुळे या दोन्ही बालकांच्या आयुष्यात ऐकण्याचा नवा अध्याय सुरू झाला असून, त्यांच्या कानावर आता आवाज पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis