
रत्नागिरी, 21 मार्च, (हिं. स.) : संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे 3 कोटी रुपये खर्च करून 5 संविधान भवन उभारण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.
या संविधान भवनामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन समिती खर्च आढावा बैठकीसह विविध आढावा बैठक आज घेण्यात आल्या. त्यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, जि. प. सदस्य बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री सामंत म्हणाले, संविधान भवन वर्षभरात हे काम पूर्ण करावे. राजिवडा पोलीस ठाण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्याची सूचनाही त्यांनी केली. विमानतळ बांधकाम, रेल्वे स्टेशन बांधकाम, स्मार्ट सिटी कामे याबाबतही पालकमंत्र्यानी आढावा घेतला. ३० एप्रिलपर्यंत विमानतळाबाबत सुविधा पूर्ण कराव्यात, असे ते म्हणाले. उद्या, रविवारी प्रांताधिकारी कार्यालयात हॉटेल, महानगर गॅस यांचे संयुक्त रजिस्ट्रेशन शिबिर घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
ग्रामीण भागात असणाऱ्या सीएसईकडून गॅस सिलिंडरबाबत गैरव्यवहार झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बाल विकास विभागाने ज्या महिलांची ई-केवायसी राहिलेली आहे, ती करून घ्यावी. ज्या महिला जिल्ह्याबाहेर आहेत, अशांची यादी जिल्हा परिषदेकडे द्यावी. जिल्हा परिषद पदधिकाऱ्यांनी याबाबत पडताळणी करावी. त्यांना 31 मार्च पर्यंत मुदत देऊन ई केवायसी करण्याबाबत सूचना द्याव्यात. यामधून जिल्ह्यातील जवळपास 3 लाख 15 हजार भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल. 40 ते 60 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्यांना 12 हजार रुपये, 60 ते 80 टक्के असणाऱ्यांना 14 हजार आणि 80 ते 100 असणाऱ्यांना 16 हजार रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी