उत्तरप्रदेशात गोरक्षकाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
संतप्त जमावाकडून महामार्गावर आंदोलन मथुरा , 21 मार्च (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या मथुरा येथे ‘फरसा वाले बाबा’ म्हणून ओळखले जाणारे गोरक्षक चंद्रशेखर यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. गोतस्करांचा पाठलाग करताना ही घटना घडली असून, त्यानंतर परिसरात
गोरक्षक चंद्रशेखर उपाख्य फरसावाले बाबा


संतप्त जमावाकडून महामार्गावर आंदोलन

मथुरा , 21 मार्च (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या मथुरा येथे ‘फरसा वाले बाबा’ म्हणून ओळखले जाणारे गोरक्षक चंद्रशेखर यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. गोतस्करांचा पाठलाग करताना ही घटना घडली असून, त्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, शुक्रवारी उशिरा रात्री चंद्रशेखर यांना कोसी राष्ट्रीय महामार्गावरून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते दोन सहकाऱ्यांसह दुचाकीवरून घटनास्थळी रवाना झाले. सुमारे7 किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांनी ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने वेग वाढवून त्यांना चिरडले आणि घटनास्थळावरून पळ काढला. अपघात इतका भीषण होता की, चंद्रशेखर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शेकडो गोरक्षक घटनास्थळी दाखल झाले. एका संशयिताला पकडण्यात आल्याचे समजते, तर इतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी दिल्ली–मथुरा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी दगडफेक केली, ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. याशिवाय पोलिसांच्या 5 ते 6 वाहनांची तोडफोड करण्यात आली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळ्या सोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही विरोधाचा सामना करावा लागला. चंद्रशेखर उर्फ ‘फरसा वाले बाबा’ हे बरसाना येथील अजानौख गावातील गोशाळा चालवत होते आणि ब्रज परिसरात गोरक्षणासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्यूमुळे गोरक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande