'पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा' - उपराष्ट्रपती
मुंबई, 21 मार्च (हिं.स.)। आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुक
Vice President


मुंबई, 21 मार्च (हिं.स.)। आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबारहॉल येथे पार पडला, त्यावेळी या कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.सतीश सुर्यवंशी यासह, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभातील पदवीधर हे इतिहासाचा भाग बनले आहेत. या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश मिळवले नसून, हे विद्यार्थी भारताला 'ग्लोबल स्किल हब' बनवण्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड रोवणार आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर नैसर्गिक संसाधने नसतानाही जपानने केलेली प्रगती ही त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिस्तीमुळे आहे. काम करताना जपानी लोक कधीही विचलित होत नाहीत. हीच कामाप्रती निष्ठा भारतीय तरुणांनी अंगीकारली पाहिजे असेही ते म्हणाले.

विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जपावी - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य, पुनर्कौशल्य आणि कौशल्य वृद्धी तीन महत्त्वाच्या पैलूंवर भर दिला आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये या तिन्ही क्षेत्रांत साथ देण्याची क्षमता आहे. आधुनिक विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. शिक्षणामुळे शाश्वत प्रगतीकडे जाण्यासाठी चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे. पदवी मिळवणे म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही. उलट, हा आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरूवात आहे. ज्या जगात तुम्ही प्रवेश करत आहात ते अत्यंत गतिमान आणि सतत बदलणारे आहे. मध्यपूर्वेतील संघर्षांसह सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्था आणि उपजीविकेवर आधीच परिणाम होत आहे, ज्यामुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

'एआय लिविंग लॅब' उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष

उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ('डेमोग्राफिक डिविडंड') हा तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे (उदा. AI, मॅन्युफॅक्चरिंग) प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'स्किल इंडिया' ची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे. पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल 'मानव संसाधन' उपलब्ध आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 'एआय लिविंग लॅब' सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande