
लातूर, 21 मार्च (हिं.स.)।
बोथी गावातील रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. गावातील होतकरू व जिद्दी तरुण माधव अभंग शेवाळे यांची लातूर पोलीस दलात निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असताना माधव यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत झाले. घरची परिस्थिती अत्यंत साधी—आजोबा सालगडी, वडील काही काळ सालगडी म्हणून कामावर, तर आई शेतीमजुरी व घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही माधव यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मैदानी सराव यांच्या जोरावर हे यश संपादन केले. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातून पहिल्या अनुक्रमांकाने निवड होणे ही त्यांच्या कष्टांची मोठी पावती मानली जात आहे.
माधव यांच्या यशामुळे बोथी गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, गावातील तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या आनंदाच्या क्षणी गावात गुलाल उधळून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच हनुमान मंदिर येथे साखर व पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. माधव शेवाळे यांच्या यशामुळे अनेक युवकांना नवी प्रेरणा मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis