छ. संभाजीनगर - विद्यापीठाच्या संघाने जिंकली राष्ट्रीय युवक महोत्सवात तीन पारितोषिके
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने ३९ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवक महोतसवात (युनिफेस्ट) तीन पारितोषिक जिंकली. या कलावंतांचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कौतुक केले आहे. ''असोसिएशन ऑफ इ
Q


छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)।

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने ३९ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवक महोतसवात (युनिफेस्ट) तीन पारितोषिक जिंकली. या कलावंतांचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कौतुक केले आहे.

'असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी' (भारतीय विद्यापीठ संघ) यांच्यावतीने ३९ वा आंतर-विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव (युनिफेस्ट) सत्यभामा इन्टिट्यूट ऑफ सायन्स ॲंड टेक्नॉलॉजी, चेन्नई येथे संपन्न झाला. या महोत्सवात देशभरातील आठ झोनमधून तब्बल १४१ विद्यापीठांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय युवक महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. योगेश क्षीरसागर याने तालवाद्य प्रकारात देशात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले. विद्यापीठाच्या संघाने एकांकिका, इंग्रजी वक्तृत्व, ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर आणि तालवाद्य अशा एकूण ५ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये यशाचे मानकरी : योगेश क्षीरसागर (तालवाद्य - प्रथम) हे ठरले.योगेशने सादर केलेल्या 'ताल सुलतान' या वादनाने संपूर्ण सभागृहाची दाद मिळवली.

सांज घुगे (इंग्रजी वकृत्व - द्वितीय): Freedom of speech should have limits (अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असाव्यात का?) या विषयावर अत्यंत प्रगल्भ आणि प्रभावी मांडणी करत सांजने देशात दुसरे स्थान मिळवले.

रंगनाथ वेताळ (ऑन द स्पॉट पेंटिंग - चौथा): चित्रकलेसाठी 'लोकसंख्या' (Population) हा विषय देण्यात आला होता. आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने रंगनाथने ज्वलंत प्रश्न मांडत चौथे स्थान पटकावले.

विद्यापीठाच्या एकांकिका संघानेही दमदार सादरीकरण केले असून, या स्पर्धेचा अंतिम निकाल ७ एप्रिल रोजी जाहीर होणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

या स्पर्धेत विद्यापीठाच्या संघामध्ये आकाश गुंजाळ, सुमित काकडे, संकेत महालकर, पवन दशरथ, चेतन पोळ, रविंद्र कोलते, रोशनी वाघमारे, सांची आरक, नेहा इंगोले, रंगनाथ वेताळ, साहिल मेंगडे, योगेश क्षीरसागर आणि सांज घुगे या विद्यार्थी कलावंतांचा सहभाग होता.

संघाचे सांस्कृतिक समन्वयक तथा संघव्यवस्थापक म्हणून गौतम सोनवणे यांनी काम पाहिले, तर महिला संघप्रमुख म्हणून कविता दिवेकर यांनी मार्गदर्शन केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande