
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)।
लैंगिक छळासंदर्भात संसदेत मांडण्यात येणारा नवीन ’जेंडर न्यूट्रल’ कायदा क्रांतीकारक ठरेल. महिला, पुरुष व तृतीयपंथी अशा तीनही घटकांना लैंगिक छळापासून यात संरक्षण मिळणार आहे, असे प्रतिपादन एमपी विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य, कायदेतज्ञ डॉ.अपर्णा कोत्तापल्ले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अंतर्गत तक्रार समितीच्यावतीने कार्यशाळा घेण्यात आली.’ 'कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण कायदा २०१३' या विषयावर महात्मा फुले सभागृहात कार्यशाळा झाला. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर एमपी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अपर्णा कोतापल्ले यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील समितीच्या अध्यक्षस्थानी होत्या. पीठासन अधिकारी पीठासन अधिकारी डॉ.पुष्पा गायकवाड, समितीच्या सचिव डॉ.मीरा मस्के, सदस्य डॉ प्रविणा पवार, शुभदा दाणी, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ.अपर्णा कोत्तापल्ले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, शासकीय, अशासकीय संस्थामध्ये महिलांना सौहार्दाची वागणूक मिळावी तसेच लैंगिक छळ न होता समानतेची वागणूक मिळावी या हेतूने कायदा करण्यात आला. या कायद्यात गैरकृत्य करणा-यास सजा तसेच चुकीची तक्रार करणा-यास देखील दंड व सजा करण्याची तरतूद आहे. हा कायदा पुरुष व महिला दोन्ही घटकांनी समजून घेण्याची गरज आहे. कार्यालयातील कामकाज ’जेंडर न्यूट्रल’ राहिले तर अशा घटनाच घडणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या. विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समिती अत्यंत उत्तम रितीने काम करीत असल्याचे उद्घाटक प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis