
लातूर, 21 मार्च (हिं.स.) : जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या “पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” या उपक्रमांतर्गत शिरूर अनंतपाळ येथे मागील एक वर्षापासून प्रलंबित असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने निकाली काढण्यात आला. या घटनेमुळे सामाजिक ऐक्य व जातीय सलोख्याचा आदर्श निर्माण झाला आहे.
मौजे शिरूर अनंतपाळ, गट क्रमांक ३/२२ येथील शेतकरी शेरखान अब्बास तांबोळी आणि त्यांचे शेजारी धनराज वैजनाथ ओलांडे हे गेल्या 35 वर्षांपासून घनिष्ठ मित्र आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी शेत रस्त्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.
वाद वाढून स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भंडे, संबंधित बिट अंमलदार आणि तलाठी यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन दोन्ही पक्षांशी संवाद साधत संयम, समजूतदारपणा आणि कायदेशीर मार्गदर्शनाच्या आधारे तोडगा काढला.
पोलीस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे दोन्ही शेतकऱ्यांनी शांततेत आपापली मते मांडली आणि परस्पर समन्वयातून वाद मिटवला. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न कोणताही तणाव न होता सोडविण्यात यश आले.
विशेष म्हणजे, हा वाद रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मिटल्यामुळे या प्रसंगाला अधिक सामाजिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले. दोन्ही शेतकऱ्यांनी मतभेद विसरून एकमेकांना गळाभेट देत बंधुभावाचे उदाहरण घालून दिले.
यावेळी शेरखान तांबोळी यांनी उपस्थितांना शिरखुर्मासाठी आमंत्रित करून सणाचा आनंद एकत्र साजरा केला.
“पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” हा उपक्रम ग्रामीण भागातील वाद तात्काळ व शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी प्रभावी ठरत असून, यामुळे न्यायालयीन प्रक्रिया टाळून वेळ, पैसा आणि सामाजिक तणावाची बचत होत आहे. तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले.
लातूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाद-विवाद वाढविण्याऐवजी सामोपचाराने सोडवावेत, अफवांना बळी पडू नये आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. आगामी सण-उत्सव शांतता, सुरक्षितता आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरे करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis