महिलांचा बचत गट आता मोबाईलवर; रायगडमध्ये डिजिटल व्यवसायाचा नवा अध्याय
रायगड, 21 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले “मिनी सरस प्रदर्शन” हे केवळ विक्रीचे व्यासपीठ न राहता, महिला बचतगटांच्या डिजिटल व्यवसायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री अदित
Women's self-help group now on mobile; A new chapter of digital business in Raigad


रायगड, 21 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले “मिनी सरस प्रदर्शन” हे केवळ विक्रीचे व्यासपीठ न राहता, महिला बचतगटांच्या डिजिटल व्यवसायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेली विविध उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यावेळी विशेष म्हणजे १०० बचतगटांची “उमेद” अॅपवर नोंदणी करण्यात आली. त्यामुळे पारंपरिक विक्रीच्या मर्यादेतून बाहेर पडत, महिला गट आता मोबाईलच्या माध्यमातून व्यवसाय करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

आजपर्यंत बचतगटांची विक्री ही प्रदर्शन, मेळावे किंवा स्थानिक बाजारपेठांपुरती मर्यादित होती. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाल्यानंतर, भविष्यात या उत्पादनांना ऑनलाइन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे. यामुळे महिलांना २४ तास चालणारी बाजारपेठ उपलब्ध होऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी “प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरवूया” असे आवाहन करत महिला सक्षमीकरणावर भर दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, येणाऱ्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पात बचतगटांसाठी भरीव तरतूद केली जाणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनीही बचतगटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्यात सध्या १९,५६५ महिला स्वयंसहाय्यता गट कार्यरत असून, फिरते कर्ज व बँक कर्जाच्या माध्यमातून २ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच “उमेद” अंतर्गत १०० बचतगटांची अॅपवर नोंदणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल नोंदणीमुळे बचतगटांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अमित नाईक, गटनेते वैकुंठ पाटील, संतोष बैलमारे, अभिषेक विचारे, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, २४ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात विविध उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळत असून, मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळत आहे.मात्र या डिजिटल उपक्रमासोबत काही प्रश्नही पुढे येत आहेत. “उमेद” अॅपद्वारे प्रत्यक्ष ऑनलाइन विक्री कधी सुरू होणार? लॉजिस्टिक्स, डिलिव्हरी आणि पेमेंट व्यवस्था कशी उभारली जाणार?या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यास, रायगडमधील महिला बचतगट स्थानिक विक्रेत्यांपासून थेट डिजिटल उद्योजकांपर्यंतचा प्रवास पूर्ण करतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवा अध्याय लिहिला जाईल, यात शंका नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande