
अहमदाबाद, 21 मार्च (हिं.स.) : गुजरात विधानसभेत समान नागरी संहिता (यूसीसी) विधेयक मंजूर होण्याची शक्यता असताना, आज, शनिवारी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमिन पक्षाच्या (एआयएमआयएम) कार्यकर्त्यांनी जुम्मा मशिदीबाहेर निदर्शने केली.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “यूसीसी हटवा, देश वाचवा” आणि “यूसीसी रद्द करा” अशा घोषणा देत बॅनरद्वारे विरोध व्यक्त केला. हे निदर्शने पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता करण्यात आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. निदर्शनात सहभागी झालेल्या एका महिला आंदोलकाने सांगितले की, “आम्ही यूसीसीच्या विरोधात एकत्र आलो आहोत. आमची शरियत याला मान्यता देत नाही. हे देशाच्या संस्कृतीच्या विरोधात आहे, त्यामुळे हे विधेयक रद्द करावे. उत्तराखंडमध्ये यूसीसीला झाला नसला तरी गुजरातमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, 18 मार्च रोजी यूसीसी विधेयकावर राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली होती आणि लवकरच हे विधेयक विधानसभेत सादर होण्याची शक्यता आहे.
या विधेयकाच्या मसुद्यात वैयक्तिक कायद्यांमध्ये पारदर्शकता आणि समानता आणण्यावर भर देण्यात आला आहे. प्रस्तावित तरतुदींनुसार, राज्यातील सर्व विवाहांची नोंदणी अनिवार्य असेल. नोंदणी नसल्यास विवाह अवैध मानला जाणार नाही, मात्र नोंदणी न केल्यास 10 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, वारसा हक्काच्या बाबतीत, इच्छापत्र नसल्यास मृत व्यक्तीची मालमत्ता आई-वडील, पत्नी/पती आणि मुलांमध्ये समान वाटली जाईल, अशी तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी