झी नाट्यगौरव २०२६ जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना प्रदान
मुंबई, 22 मार्च (हिं.स.)। मराठी नाट्यसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे *‘झी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’.* यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ह्यावेळेची थीम होती मराठी नाकाचा दौरा. यात दौऱ्यात होणाऱ्या गमती जमती, किस्से, याची स
झी नाट्यगौरव २०२६ जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना जाहीर


मुंबई, 22 मार्च (हिं.स.)। मराठी नाट्यसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे *‘झी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’.* यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ह्यावेळेची थीम होती मराठी नाकाचा दौरा. यात दौऱ्यात होणाऱ्या गमती जमती, किस्से, याची सुंदर सांगड अनुभवायला मिळाली. ह्यावर्षीच्या नाट्यगौरव जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या *जेष्ठ लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे.*

आई आपल्या मुलांना झोपवतांना गोष्टी सांगत असते. पण एकदा असं झालं की आईला आला कंटाळा! तेव्हा ती म्हणाली, “आज तूच गोष्ट सांग बरं.” मग त्या चिमुरडीनं आईला गोष्ट सांगितली. गोष्टही अशी की आईला झोप येण्याऐवजी गोष्टीत रसच येऊ लागला आणि तिची झोपच उडाली. अशा रीतीनं सुरू झाला तिचा गोष्ट रचण्याचा प्रवास. ती चिमुरडी होती — लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे.

आई लेखिका आणि वडील चित्रकार असल्यामुळे त्यांच्याकडे वारशानेच एक रंगभाषा आली. ती तुमच्या आईने वाढवली आणि ती तुम्ही जोपासली. पण तुमच्या कथा केवळ ‘बेडटाईम स्टोरीज’ पुरत्याच न ठेवता, आईने रोज दोन पानं लिहिण्याची शिस्त तुम्हाला लावली. आणि यातूनच सुरू झालं गोष्टी लिहिण्याचं सत्र. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ‘मुलांचा मेवा’ हे पुस्तक प्रकाशित होणं ही सई परांजपे ह्यांच्यासाठी प्रतिभेची पहिली ठळक नोंद होती.

“मुलं लहान वयापासून सुंदर लिखाण करू शकतात, पण दुर्दैव असं की त्यांना शकुंतला परांजपे नावाची आई लाभत नाही,” हे तुमचं वाक्य तुमच्या कलाजीवनात आईचं स्थान किती मोठं आहे हे अधोरेखित करतं.

आई शकुंतला परांजपे आणि आजोबा रॅंगलर परांजपे यांच्या देखरेखीखाली पुण्यात काटेकोर शिस्तीत झालेली तुमची जडणघडण, पुढे तुमच्या बहुआयामी कारकिर्दीचा भक्कम पाया ठरली. कॉलेजमध्ये असताना आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘निवेदिका’ म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला. ‘बालोद्यान’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही अनेक बालनाटके लिहिली, बसवली आणि सादर केली. याच प्रयत्नांतून बालरंगभूमीची कल्पना प्रत्यक्षात उतरली. ‘पत्तेनगरी’ पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘शेपटीचा शाप’, ‘जादूचा शंख’, ‘झाली काय गंमत’, ‘भटक्यांचे भविष्य’, ‘हरवलेल्या खेळण्यांचे राज्य’, ‘पक्ष्यांचं कविसंमेलन’, ‘देवाची फुलं’, ‘सळो की पळो’, ‘माझा खेळ मांडू दे’ अशा अनेक अविस्मरणीय नाटकांपर्यंत विस्तारला.

‘पत्तेनगरी’च्या प्रयोगाला भारताचे तत्कालीन मंत्री श्री. बाळकृष्ण केशकर प्रमुख पाहुणे होते. बालरंगभूमीचा बोलबाला इतका वाढला की एकदा तर यशवंतराव चव्हाण आणि खुद्द पंडित नेहरूही नाटकाला आले होते. पुढे तुम्ही ‘एक तमाशा अच्छा खासा’, ‘गीध’, ‘धिक् ताम्’, ‘पुन्हा शेजारी’, ‘जास्वंदी/पंजे’, ‘आलबेल’, ‘सख्खे शेजारी’, ‘बिकट वाट वहिवाट’ अशी अनेक नाटके यशस्वीरित्या रंगमंचावर आणलीत. लग्नानंतर तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथे नाटक शिकायला गेलात. पुढे शिष्यवृत्ती मिळवून तुम्ही पॅरिसच्या रंगभूमीवरून अनेक गोष्टी शिकून आलात. रंगभूमीव्यतिरिक्त चित्रपट, साहित्य, दूरदर्शन, रेडिओ, माहितीपट — ह्या सगळ्या विश्वांमधलं तुमचं योगदान आणि कारकीर्द अत्यंत महत्त्वाची आणि अभूतपूर्व आहे.

नसीरुद्दीन शहा, फारुख शेख, दीप्ती नवल, शबाना आझमी, नाना पाटेकर, ओम पुरी, रघुवीर यादव, निळू फुले अशा अनेक दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन, तुमच्या दिग्दर्शनाखाली हिंदी सिनेमाला एक नवा, संवेदनशील आणि आशयघन अध्याय लाभला. तबलावादक झाकीर हुसैन यांच्या वादनाने डोळे मिटून मंत्रमुग्ध होणारे आम्ही सगळेचं आहोत, पण डोळे उघडून त्यांच्यात सिनेमातला नायक पाहू शकला ते तुम्हीच. पद्मभूषण ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असे कितीतरी सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला लाभले, पण त्याहीपेक्षा रसिकांच्या मनातलं तुमचं ‘अढळ’

स्थान अधिक उंच आहे. गल्लाभरू कामापेक्षा तुमची नाटके आणि सिनेमे हे ‘कलात्मक’ आणि ‘करमणूकप्रधान’ अधिक होते, आणि म्हणूनच ते आजही महत्त्वाचे ठरतात.

तुमच्या तिरकस शैलीतून माणसांच्या कथा वाचताना जाणवत राहतं की ‘खिडकीतल्या मांजराला’ खरंच काय काय दिसत असेल. तुमचे निखळ हसू आणि मांजरागत आरपार काचडोळे , दोन्हींतून आपलेपणा आणि भीती समसमान कशी वाटते. अनेक क्षेत्रांत पाळंमुळं पसरलेलं, असंख्य फांद्यांचं हे ‘इवलंस रोप’ पाहून सांगावंसं वाटतं.. सईबाई, तुम्ही कधीही न कोसळणारी भव्य ‘पत्तेनगरी’ रचली आहे. तुमच्या प्रदीर्घ, देदीप्यमान आणि बहुआयामी नाट्यकारकीर्दीला झी नाट्यगौरवकडून मानाचा मुजरा.

तेव्हा पाहायला विसरू नका हा नाटकांचा दौरा ‘झी नाट्यगौरव पुरस्कार २०२६’ रविवार २२ मार्च संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande