
- मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख , जखमींना 50 हजारांंची मदत जाहीर
लखनऊ, 23 मार्च (हिं.स.)। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील फाफामऊ परिसरात भीषण दुर्घटना घडली असून कोल्ड स्टोरेजच्या इमारतीचे छत कोसळल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना प्रयागराज-लखनौ महामार्गावरील चांदपूर येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदर्श कोल्ड स्टोरेज’मध्ये सोमवारी दुपारी कामगार बटाटे ठेवण्याचे काम करत होते. याच दरम्यान अचानक मोठा स्फोट होऊन इमारतीचा एक भाग कोसळला. छत कोसळताना अमोनिया गॅसची पाइपलाईन फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आणि ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा, पोलीस आयुक्त जोगेंद्र कुमार आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या दुर्घटनेत बिहारमधील ज्योतिष (३२), मसिंदर, सनाेज आणि स्थानिक रहिवासी जगदीश यांचा मृत्यू झाला आहे. अमरजीत आणि लहान कार्तिक यांच्यासह एकूण १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी सुमारे १२० लोक तेथे उपस्थित होते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या कोल्ड स्टोरेजचे मालक समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अन्सार अहमद असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’तून ((पीएमएनआरएफ) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर संदेश देत या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले की,उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. या कठीण प्रसंगी बाधित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule