
नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.)। रिझर्व्ह बँकेने सोमवारी एकदिवसीय ‘व्हेरिएबल रेट रेपो’ (व्हीआरआर) लिलावाद्वारे बँकिंग प्रणालीत 79,256 कोटी रुपयांची तात्पुरती रोख रक्कम उपलब्ध करून दिली. आरबीआयच्या माहितीनुसार, ही रक्कम 5.26 टक्के ‘कट-ऑफ’ दराने तसेच त्याच दराच्या भारित सरासरीवर वितरित करण्यात आली. ही रक्कम अधिसूचित एक लाख कोटी रुपयांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. अग्रिम कर भरण्यामुळे बँकिंग प्रणालीतील अतिरिक्त तरलतेत मोठी घट झाली आहे.
प्रत्यक्षात, 23 मार्चपर्यंत बँकिंग प्रणालीतील तरलतेचा तुटवडा सुमारे 65,395.64 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. यापूर्वी 20 मार्च रोजी आरबीआयने तीन दिवसांच्या व्हीआरआर लिलावाद्वारे 25,101 कोटी रुपये प्रणालीत आणले होते. तसेच, 17 मार्च रोजी सात दिवसांच्या व्हीआरआर लिलावातून 48,014 कोटी रुपयांची तरलता उपलब्ध करून देण्यात आली होती.
याशिवाय, जानेवारी 2026 पासून आतापर्यंत आरबीआयने सरकारी रोख्यांची (गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) खुले बाजारातील खरेदी करून बँकिंग प्रणालीत सुमारे 3.50 लाख कोटी रुपयांची स्थायी तरलता निर्माण केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule