
-एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 13.99 लाख कोटी रुपयांचे नुकसान
-सेन्सेक्स इंट्रा-डे मध्ये 1,974 अंकांनी घसरला, निफ्टी 643 अंकांनी कोसळला
नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही मोठ्या प्रमाणात कोसळले. या तीव्र घसरणीमुळे आठवड्याचा पहिला व्यवहार दिवस शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. व्यापक बाजारातही आज मोठी घसरण नोंदवली गेली. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 1,970 अंकांहून अधिक घसरला, तर निफ्टी 640 अंकांपेक्षा अधिक खाली आला. शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे दोन्ही निर्देशांकांनी तळाच्या पातळीवरून थोडी सुधारणा दाखवली. अखेर सेन्सेक्स 2.46 टक्के आणि निफ्टी 2.60 टक्के घसरणीसह बंद झाले.
आजच्या व्यवहाराची सुरुवातच कमजोरीने झाली. बाजार उघडताच जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून आला आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण वाढली. काही वेळानंतर खरेदी वाढल्यामुळे थोडी सुधारणा झाली, परंतु ती टिकली नाही. लवकरच पुन्हा विक्रीचा दबाव वाढला आणि बाजार पुन्हा कोसळला. दुपारी एकच्या सुमारास खरेदीदारांनी बाजार सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र सायंकाळी तीननंतर विक्रेत्यांचा पूर्ण वर्चस्व राहिल्याने बाजार पुन्हा घसरला.
आज दिवसभर सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव होता आणि सर्व सेक्टर लाल निशाणात बंद झाले. ग्राहक टिकाऊ वस्तू (कंज्युमर ड्युरेबल) आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली. कंज्युमर ड्युरेबल निर्देशांक 4.91 टक्के आणि मेटल निर्देशांक 4.76 टक्क्यांनी घसरले. याशिवाय बँकिंग, ऑटोमोबाईल, कॅपिटल गुड्स आणि ऑइल अँड गॅस निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक घसरले. तसेच पीएसयू, टेक, हेल्थकेअर, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रही तोट्यात बंद झाले. व्यापक बाजारातही मोठी विक्री झाली, ज्यामुळे निफ्टी मिडकॅप निर्देशांक 3.90 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 3.94 टक्के घसरले.
या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 14 लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 415.12 लाख कोटी रुपयांवर आले, जे मागील शुक्रवारी 429.11 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच एका दिवसात सुमारे 13.99 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
आज बीएसईमध्ये 4,556 शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी 581 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 3,858 शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि 117 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. एनएसईमध्ये 3,040 शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी 213 शेअर्स वाढले, तर 2,827 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 4 शेअर्स वाढीसह, तर 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीमधील 50 पैकी 4 शेअर्स वाढीसह आणि 46 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्स आज 800.38 अंकांच्या घसरणीसह 73,732.58 वर उघडला. व्यवहाराच्या सुरुवातीलाच तो 1,555.62 अंकांनी घसरून 72,977.34 पर्यंत गेला. त्यानंतर काही काळ खरेदी वाढली, पण पुन्हा विक्रीचा दबाव वाढला. सततच्या विक्रीमुळे सेन्सेक्स 1,974.52 अंकांनी घसरून 72,558.44 पर्यंत खाली आला. शेवटी थोड्या खरेदीमुळे तो 1,836.57 अंकांच्या घसरणीसह 72,696.39 वर बंद झाला.
निफ्टीनेही 290.15 अंकांच्या घसरणीसह 22,824.35 वर व्यवहार सुरू केला. सुरुवातीलाच तो 22,634.55 पर्यंत घसरला. काही वेळात तो 22,851.70 पर्यंत सावरला, पण पुन्हा विक्री वाढल्यामुळे तो 22,471.25 पर्यंत खाली आला. शेवटी थोड्या सुधारनेसह निफ्टी 601.85 अंकांच्या घसरणीसह 22,512.65 वर बंद झाला.
आजच्या व्यवहारात प्रमुख वाढीतील शेअर्समध्ये एचसीएल टेक्नॉलॉजी (1.87%), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (1.51%), इन्फोसिस (0.28%), टेक महिंद्रा (0.19%) आणि ओएनजीसी (0.02%) यांचा समावेश होता. दुसरीकडे श्रीराम फायनान्स (6.49%), टायटन कंपनी (6.17%), ट्रेंट लिमिटेड (5.70%), जिओ फायनान्शियल (5.52%) आणि अल्ट्राटेक सिमेंट (5.23%) हे सर्वाधिक घसरणारे शेअर्स ठरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule