
नवी दिल्ली, २३ मार्च (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फॅन पार्क २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा कार्यक्रम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या उद्घाटन सत्रासोबतच आयोजित केला जाईल आणि देशभरातील चाहत्यांना यामुळे स्टेडियमबाहेर आयपीएलचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या तीन आठवड्यांत ११ राज्यांमधील १५ शहरांमध्ये फॅन पार्क आयोजित केले जातील. या कार्यक्रमांचा उद्देश आयपीएलचा थरार जास्तीत जास्त चाहत्यांपर्यंत पोहोचवणे आणि सामुदायिक वातावरणात सामन्यांचा आनंद घेणे हा आहे.
फॅन पार्क तीन आठवड्यांच्या शेवटी आयोजित केले जातील: पहिला आठवडा २८ आणि २९ मार्च, दुसरा आठवडा ४ आणि ५ एप्रिल, आणि तिसरा आठवडा ११ आणि १२ एप्रिल, २०२६ रोजी असेल.
देशभरात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागांमध्ये प्रत्येक आठवड्याच्या शेवटी पाच फॅन पार्क उभारले जातील.
पहिल्या आठवड्यात रोहतक (हरियाणा), भोपाळ (मध्य प्रदेश), नागपूर (महाराष्ट्र), तुमकूर (कर्नाटक) आणि कृष्णनगर (पश्चिम बंगाल) येथे फॅन पार्क उभारले जातील.
दुसऱ्या आठवड्यात मथुरा (उत्तर प्रदेश), जोधपूर (राजस्थान), निझामाबाद (तेलंगणा), म्हैसूर (कर्नाटक) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे कार्यक्रम होतील.
तिसऱ्या आठवड्यात मेरठ (उत्तर प्रदेश), नडियाद (गुजरात), रत्नागिरी (महाराष्ट्र), कोईम्बतूर (तामिळनाडू) आणि रुरकेला (ओडिशा) येथे फॅन पार्क आयोजित केले जातील.
प्रत्येक फॅन पार्कमध्ये मोठ्या स्क्रीनवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण, तसेच संगीत, मनोरंजन, फूड कोर्ट, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि विविध इंटरॅक्टिव्ह उपक्रम असतील. प्रेक्षकांना व्हर्च्युअल बॅटिंग, बॉलिंग नेट्स, फेस पेंटिंग, चीअर मीटर आणि ३६०-डिग्री फोटो बूथ यांसारख्या सुविधांचाही आनंद घेता येईल.
२०१५ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने आयपीएलला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही परंपरा २०२६ मध्येही सुरू राहील, ज्यामुळे लाखो प्रेक्षकांना आपापल्या शहरांमध्ये आयपीएलचा आनंद साजरा करता येईल. बोर्डाने सांगितले की, आगामी आठवड्यांसाठी फॅन पार्कचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे