
नवी दिल्ली, २३ मार्च (हिं.स.) । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फेब्रुवारी २०२६ साठी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुरुषांच्या गटात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानला, तर महिलांच्या गटात भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीला हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील चाहत्यांची मते आणि माजी खेळाडू व तज्ञांच्या पॅनेलच्या आधारावर दोन्ही क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल साहिबजादा फरहानने हा पुरस्कार पटकावला. त्याने एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला आणि नामिबिया व श्रीलंकेविरुद्ध दोन शतके झळकावून इतिहास रचला. फरहानने फेब्रुवारी महिन्यात सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७६.६० च्या सरासरीने आणि १६०.२५ च्या स्ट्राइक रेटने ३८३ धावा केल्या.
पुरुषांच्या गटात फरहानने इंग्लंडच्या विल जॅक्स आणि अमेरिकेच्या शॅडली व्हॅन शॅल्कविकला मागे टाकले, तर महिलांच्या गटात रेड्डीने श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमा आणि पाकिस्तानच्या फातिमा सना यांना मागे टाकत पुरस्कार पटकावला. फरहान म्हणाला, हा पुरस्कार जिंकणे माझ्यासाठी खूप खास आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर कामगिरी करणे ही अभिमानाची बाब आहे आणि मला ही लय कायम ठेवायची आहे.
अरुंधती रेड्डीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या २-१ विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने तीन सामन्यांमध्ये एकूण आठ विकेट्स घेतल्या होत्या. ४/२२, २/३० आणि २/३५ अशी तिची कामगिरी या मालिकेत झाली होती. तिची सरासरी १०.८७ आणि इकॉनॉमी रेट ७.२५ होता. अरुंधती रेड्डी म्हणाली, विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये संघाच्या विजयात योगदान दिल्यानंतर हा सन्मान मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे