युवकांनी शहीदांचे आदर्श प्रत्यक्ष कृतीत उतरवावेत - रक्षा खडसे
नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) - शहीदांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत उतरवा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. जे राष्ट्र आपला इतिहास स्मरणात ठेवते ते बलशाली आणि आत्मनिर्भर राहते. माय भारत लक्षावधी तरुण नागरिकांना राष्ट्रनिर्मितीमध्ये
रक्षा खडसे


नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) - शहीदांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत उतरवा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. जे राष्ट्र आपला इतिहास स्मरणात ठेवते ते बलशाली आणि आत्मनिर्भर राहते. माय भारत लक्षावधी तरुण नागरिकांना राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान देण्यास सक्षम करत आहे. विकसित भारत 2047 प्रत्यक्षात साकारणे हे प्रामुख्याने युवा नेतृत्वावर अवलंबून असेल. त्यासोबतच, त्याग, जबाबदारी आणि सेवा ही मूल्ये तरुणांनी आपल्या आचरणात आणावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

शहीद दिवसाच्या निमित्ताने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 'मेरा युवा भारत (माय भारत) च्या माध्यमातून 23 मार्च रोजी मेरा भारत, मेरी जिम्मेदारी (माझा भारत, माझी जबाबदारी) या संकल्पनेवर आधारित देशव्यापी पदयात्रा आयोजित केली. सहभागासाठी देशातील सर्व 763 जिल्ह्यांमधील युवकांना प्रोत्साहित करण्यात आले. फरिदाबाद येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यात आला यातून राष्ट्र उभारणीत चांगल्या युवा सहभागाचे प्रतिबिंब दिसून आले. या कार्यक्रमाला युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे; हरियाणाचे युवा सक्षमीकरण आणि उद्योजकता राज्यमंत्री गौरव गौतम; आणि 'माय भारत' च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रियांका शुक्ला (भा.प्र. से) उपस्थित होते.

फरिदाबाद येथे मुख्य पदयात्रा 'के.एल. मेहता दयानंद महिला महाविद्यालया'पासून सुरू झाली. या पदयात्रेच्या प्रारंभी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली; त्यानंतर 'वंदे मातरम'चे गायन झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत 'शहीद भगतसिंग चौका'पाशी पदयात्रेची सांगता झाली. इथे सहभागींनी या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.

पदयात्रेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, तरुणांचा सहभाग अधिकाधिक वाढावा या उद्देशाने विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'माय भारत' पोर्टलवर (mybharat.gov.in) राबवण्यात आलेल्या देशव्यापी डिजिटल मोहिमेचा समावेश होता. या मोहिमेअंतर्गत अनेक अज्ञात नायक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच, तरुणांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायी कथा जगासमोर आणण्यासाठी 'एक युवा ऐसा भी' या शीर्षकाखाली 'रील-मेकिंग' स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

या देशव्यापी उपक्रमाचाच एक भाग म्हणून, 'माय भारत सिव्हिक सेन्स चॅलेंज' उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'श्रमदान' उपक्रम राबवण्यात आले. नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणि सामूहिक कृतीची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, या उपक्रमांमध्ये स्वच्छता मोहीम आणि रस्ते सुरक्षा जागृती मोहिमांचा समावेश करण्यात आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande