विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह 9 सदस्यांना निरोप
शिंदे-ठाकरे भाषणातून दिसला मवाळपणा मुंबई, 24 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेत मंगळवारी 9 सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश हो
उद्धव ठाकरे विधान परिषदेत बोलताना


शिंदे-ठाकरे भाषणातून दिसला मवाळपणा

मुंबई, 24 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेत मंगळवारी 9 सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. यानिमित्ताने सभागृहात आयोजित निरोप समारंभात सदस्यांनी भावनिक तसेच राजकीय भूमिका मांडत आपल्या आठवणी व्यक्त केल्या.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधित्व असून त्यात भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शरद पवार गटाचा एक आणि काँग्रेसचा एक सदस्य यांचा समावेश आहे.उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर हे प्रमुख सदस्य आज निवृत्त झाले. हे सर्व सदस्य 14 मे 2020 रोजी निवडून आले होते. काहींनी जवळपास सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, तर काहींना तुलनेने कमी कालावधी मिळाला.सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे या सदस्यांच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन ठरले. त्यानुसार मंगळवारी (24 मार्च) त्यांना अधिकृत निरोप देण्यात आला.

शिंदे-ठाकरे यांच्यातील सौम्य सूर चर्चेत

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले होते. मात्र, आजच्या निरोप समारंभात शिंदे यांच्या भाषणात संयमित आणि मवाळ भूमिका दिसून आली.

उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना शिंदे यांनी “उद्धव ठाकरे साहेब” असा आदरपूर्वक उल्लेख करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या बदललेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, हे केवळ शिष्टाचार होते की बदलत्या समीकरणांची सुरुवात, याबाबत तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत.

उद्धव ठाकरे यांचे भावनिक भाषण

निरोपपर भाषणात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. मुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेत प्रवेश केल्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला.

विंदा करंदीकर आणि सुरेश भट यांच्या कवितांचा उल्लेख करत त्यांनी राजकारणातील बदलत्या नातेसंबंधांवर भाष्य केले. “केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये… होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे,” अशा ओळींद्वारे त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

शेवटी, सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानत त्यांनी सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुढील राजकारणावर लक्ष

या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त होत आहे. शिंदे-ठाकरे यांच्यातील आज दिसलेला सौम्य संवाद आगामी काळात कोणते राजकीय संकेत देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande