
गांधीनगर, 25 मार्च (हिं.स.) : गुजरात विधानसभेत तब्बल 7 तास झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी रात्री समान नागरिक संहिता विधेयक (यूसीसी) पारित झाले. या निर्याचे भाजपकडून स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनी या निर्णयाला “एक राष्ट्र, एक कायदा” या दिशेतील मोठा पाऊल असल्याचे सांगितले.
जगदीश विश्वकर्मा यांनी बुधवारी सांगितले की हा निर्णय कुठल्याही तातडीने घेतलेला नाही, तर हा पक्षाच्या जुन्या विचारसरणी आणि दीर्घ संघर्षाचा परिणाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय ‘एक राष्ट्र, एक कायदा’ या तत्वाच्या दिशेने ठोस पाऊल आहे. या कायद्यामुळे लग्न, वारसा, दत्तक, घटस्फोट, संपत्तीवरील हक्क आणि पालकत्व यांसारख्या वैयक्तिक बाबींमध्ये सर्व समुदायांसाठी समान कायदेशीर ढांचा तयार होणार आहे. आतापर्यंत या बाबींवर धर्म, जाती आणि सांस्कृतिक परंपरांनुसार वेगळे कायदे होते. यूसीसी लागू झाल्यानंतर हे सर्व कायदेशीर भेद दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्षांनी हा दिवस गुजरात आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी हे देखील नमूद केले की हा निर्णय पक्षाच्या वैचारिक बांधिलकीचा भाग आहे. जगदीश विश्वकर्मा यांनी 1952 च्या भारतीय जनसंघाच्या संकल्पांचा उल्लेख करत सांगितले की त्या वेळी अनुच्छेद 370 रद्द करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि समान नागरिक संहिता लागू करणे याची मागणी होती. आज अनुच्छेद 370 रद्द झाला, भव्य राम मंदिर उभारले गेले आणि आता गुजरातने यूसीसी बिलही पारित केले आहे.विश्वकर्मा यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आणि आरोप केला की विरोधकांनी दशके फक्त मतदानासाठी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी हा कायद्याचा विरोध केला आणि देशाला विभक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की जे लोक म्हणत होते की राम मंदिर कधीही उभे राहणार नाही किंवा अनुच्छेद 370 रद्द झाल्यावर रक्तस्राव होईल, आज ते चुकीचे ठरले आहे. हा कायदा कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देतो.
यासोबतच त्यांनी नमूद केले की राज्य सरकारने संविधानाच्या अनुच्छेद 44 च्या अनुषंगाने काम केले आहे आणि समान कायदेशीर व्यवस्था मजबूत केली आहे. या पावलामुळे सरकारने जनता समोर केलेले वचन ‘सर्वांचा साथ, सर्वाचा विकास आणि सर्वांचा न्याय’ पूर्ण केले आहे. त्यांनी असेही सांगितले की जनसंघाच्या संकल्प, भाजपाची बांधिलकी आणि केंद्रातील नेतृत्वाच्या सहकार्याने भारत नवीन दिशेकडे प्रगती करत आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी