
नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) - स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर ट्यून'ने (संकेत-धुन) आणि त्यानंतर 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताच्या दोन कडव्यांच्या आवृत्तीने (कालावधी 65 सेकंद) करण्याची परंपरा आहे.
28 जानेवारी 2026 रोजी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या राष्ट्रीय गीताशी संबंधित मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने, 26 मार्च 2026 पासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून रोज सहा कडव्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय गीत प्रसारित केले जाईल.नवीन आवृत्तीचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद आहे.
प्रसारित होणारी सुरवातीची आवृत्ती, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. चंद्रशेखर वझे यांनी 'राग देस'मध्ये गायली आहे.
वाद्यवृंदाच्या प्रादेशिक वैविध्याचा समावेश करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय गीताच्या आणखी काही आवृत्त्या ध्वनिमुद्रित केल्या जात आहेत. या आवृत्त्या संबंधित राज्यांमधील आकाशवाणी केंद्रांद्वारे स्वीकारल्या जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी