
जळगाव, 25 मार्च (हिं.स.) : काही दिवसांपूर्वी केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता केळीचे दर पुन्हा कोसळले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी फळांची निर्यात थांबल्याने केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
निर्यात बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळी आणि इतर फळे स्थानिक बाजारात आली आहेत. सण-उत्सव संपल्याने मागणी कमी झाल्यामुळे केळी भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीचे दर प्रतिक्विंटल ४५० ते ५०० रुपयांदरम्यान आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.तापत्या उन्हामुळे उत्पादन वाढले असताना उत्तर भारतात अवकाळी पावसामुळे मागणीत घट झाली आहे. तसेच रमजान ईद आणि नवरात्र उत्सव संपल्यावर बाजारातील उठावही कमी झालेला दिसतो.
सोलापूर परिसरातील निर्यातक्षम केळी माल स्थानिक बाजारात कमी दरात उपलब्ध असल्याने व्यापारी तिकडे वळत आहेत. त्यामुळे खान्देशातील केळीला अपेक्षित दर मिळत नाहीत. बऱ्हाणपूर येथील केळी लिलाव बाजारातही पूर्वीसारखी स्पर्धा राहिलेली नाही, आणि व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यवहार करत असल्याची तक्रार शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेवरील विश्वास कमी झाला आहे.
याशिवाय, नेपाळकडे होणारी निर्यात गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून राज्य व केंद्र सरकारला यावर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.सध्या भाव कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर