
नवी दिल्ली , 25 मार्च (हिं.स.)।काँग्रेस पक्षाला देशाची राजधानी दिल्लीत असलेल्या त्यांच्या दोन जुन्या कार्यालये रिकामी करण्यासाठी अंतिम नोटीस देण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संपदा विभागाने पक्षाला 24, अकबर रोड आणि 5, रायसीना रोड येथील दोन्ही कार्यालये 28 मार्चपर्यंत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.या नोटीसवर सध्या रणनीती आखली जात असून गरज पडल्यास काँग्रेस न्यायालयातही जाऊ शकते.
अकबर रोडवरील बंगला 1978 पासून काँग्रेसचे मुख्यालय होते. तब्बल 48 वर्षे येथे पक्षाचे कार्यालय चालले आणि अनेक महत्त्वाच्या राजकीय रणनीती येथे ठरवल्या गेल्या. गेल्या वर्षी काँग्रेसने कोटला मार्गावरील इंदिरा भवन येथे आपले नवीन मुख्यालय सुरू केले असले तरी अकबर रोडवरील जुने कार्यालय अद्याप वापरात आहे.दरम्यान, रायसीना रोड येथील कार्यालयात भारतीय युवा काँग्रेस आणि एनएसयूआय (NSUI) यांची कार्यालये कार्यरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ही नोटीस काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली असून पक्षाला एक आठवड्याचाही अवधी देण्यात आलेला नाही. ही अंतिम नोटीस असल्याचेही सांगितले जात आहे.
या प्रकरणावर काँग्रेसने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, अचानक आलेल्या या नोटीसवर सध्या रणनीती आखली जात असून गरज पडल्यास काँग्रेस न्यायालयातही जाऊ शकते. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे, “सरकारने आपले नियम सर्वांवर समानपणे लागू केले पाहिजेत. एखाद्या एका पक्षाला लक्ष्य करू नये.”
दरम्यान, इंदिरा भवन हे काँग्रेस पक्षाचे नवीन आधुनिक मुख्यालय असून ते दिल्लीतील 9A, कोटला मार्ग येथे स्थित आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर बांधलेल्या या इमारतीचे उद्घाटन 15 जानेवारी 2025 रोजी सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. सुमारे 242 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेली ही पाच मजली इमारत 2100 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली आहे.या इमारतीमध्ये 276 आसनक्षमतेचे सभागृह, अनेक बैठक कक्ष, कॉन्फरन्स हॉल आणि आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. इमारतीच्या भिंतींवर काँग्रेस आणि भारताच्या इतिहासाशी संबंधित 246 दुर्मिळ छायाचित्रे लावण्यात आली असून ती पक्षाच्या 140 वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडवतात. तसेच येथे असलेल्या ग्रंथालयाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode