
लातूर, 25 मार्च (हिं.स.)। शेती आणि गाव पाणीदार करण्याच्या उद्देशाने सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. उजना (ता. अहमदपूर) च्या वतीने येत्या शुक्रवारी, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता शहरातील दीपवर्षा मंगल कार्यालय येथे भव्य 'जलतारा-पाणी परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेला मिळालेले अपार यश आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद व वाढती मागणी लक्षात घेता यावर्षीही या महत्त्वपूर्ण परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे उपस्थित राहणार आहेत.
या पाणी परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे 'जलतारा' प्रकल्पाचे जनक प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ हे स्वतः उपस्थित राहून शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या शेतात जलतारा प्रकल्प नेमका कसा राबवावा आणि त्या माध्यमातून विहिरी तसेच कूपनलिकेची (बोर) पाणीपातळी कशी वाढवावी, यावर ते तांत्रिक व प्रयोगात्मक माहिती देणार आहेत. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश बाळासाहेब जाधव, संचालिका दीपाली अविनाश जाधव, सुरज बाबासाहेब पाटील (पी.जी. सन्मान), जनरल मॅनेजर केन पी.एल. मिटकर आणि दिनदार यांच्यासह सिद्धी शुगरचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. अहमदपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि गाव समृद्ध करण्यासाठी या जलतारा पाणी परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis