
नवी दिल्ली, २५ मार्च (हिंस.). घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगच्या अंतिम मुदतीत बदल झाल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेले वृत्त केंद्र सरकारने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एलपीजी बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरांमध्ये २५ दिवसांत आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांत एलपीजी सिलिंडर उपलब्ध होतील.
बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, काही बातम्या आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये एलपीजी रिफिल बुकिंगच्या सुधारित अंतिम मुदतीचा दावा केला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) कनेक्शनसाठी ४५ दिवस, नॉन-PMUY सिंगल-बॉटल कनेक्शनसाठी २५ दिवस आणि नॉन-PMUY डबल-बॉटल कनेक्शनसाठी ३५ दिवसांचा समावेश आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, एलपीजी रिफिल बुकिंगची सध्याची अंतिम मुदत कायम राहील. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सध्याच्या रिफिल बुकिंगच्या अंतिम मुदतीत कोणताही बदल नाही. सरकारने नागरिकांना अशा दिशाभूल करणाऱ्या माहिती आणि अफवांपासून सावध राहण्याचे आणि त्यावर विश्वास न ठेवण्याचे किंवा त्या पुढे न पसरवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अनावश्यक किंवा घाबरून एलपीजी बुकिंग न करण्याचा सल्लाही दिला आहे. मंत्रालयाने असेही आश्वासन दिले आहे की, देशात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि तुटवड्याची कोणतीही भीती नाही, त्यामुळे ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे